पुण्यातले दिवस - भाग 1
BAच्या शेवटच्या वर्षाला नापास झाल्यानंतर पुढचं वर्षभर करायचं काय, हा एक मोठा सुखद प्रश्न माझ्यापुढं होता. पुरेसा अभ्यास न झाल्यामुळं आपण या वर्षी ब्रेक घेऊन पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी, असा एक क्रांतीकारक विचार त्यावेळी मनात आला होता. परीक्षेला काही आठवडे उरले होते. इतक्या कमी वेळेत अभ्यास करण्यापेक्षा, हा क्रांतीकारक विचार मनाला जास्त दिलासा देत होता. पण इतिहासातल्या क्रांतीकारकांपेक्षा माझी चिंता वेगळी होती. क्रांती करणं सोपं होतं. त्या क्रांतीची कल्पना घरी देणं महामुश्कील होतं. खरं तर आपला निर्णय घरी जाहीर करणं, हाच त्या क्रांतीतला सर्वात कठीण आणि आव्हानात्मक टप्पा होता. परीक्षेत उत्तरपत्रिका लिहीताना सोपे प्रश्न अगोदर सोडवायचे, अवघड प्रश्न नंतर सोडवायचे, असं प्राध्यापकांनी सांगितलं होतं. त्याचं तंतोतंत पालन करावं, असं मी ठरवलं. त्यामुळं अगोदर क्रांती केली आणि मगच त्याची कल्पना घरी दिली. तसं करण्यामागे अजूनही एक खोल विचार होता. माझ्या निर्णयाबाबत माझं मनपरिवर्तन करण्याची कुठलीही संधी कुणालाही मिळणार नव्हती. परीक्षेचा पहिला दिवस. मी वेळेवर...