पुण्यातले दिवस - भाग 1
BAच्या शेवटच्या वर्षाला नापास झाल्यानंतर पुढचं वर्षभर करायचं काय, हा एक मोठा सुखद प्रश्न माझ्यापुढं होता. पुरेसा अभ्यास न झाल्यामुळं आपण या वर्षी ब्रेक घेऊन पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी, असा एक क्रांतीकारक विचार त्यावेळी मनात आला होता. परीक्षेला काही आठवडे उरले होते. इतक्या कमी वेळेत अभ्यास करण्यापेक्षा, हा क्रांतीकारक विचार मनाला जास्त दिलासा देत होता. पण इतिहासातल्या क्रांतीकारकांपेक्षा माझी चिंता वेगळी होती. क्रांती करणं सोपं होतं. त्या क्रांतीची कल्पना घरी देणं महामुश्कील होतं. खरं तर आपला निर्णय घरी जाहीर करणं, हाच त्या क्रांतीतला सर्वात कठीण आणि आव्हानात्मक टप्पा होता. परीक्षेत उत्तरपत्रिका लिहीताना सोपे प्रश्न अगोदर सोडवायचे, अवघड प्रश्न नंतर सोडवायचे, असं प्राध्यापकांनी सांगितलं होतं. त्याचं तंतोतंत पालन करावं, असं मी ठरवलं. त्यामुळं अगोदर क्रांती केली आणि मगच त्याची कल्पना घरी दिली. तसं करण्यामागे अजूनही एक खोल विचार होता. माझ्या निर्णयाबाबत माझं मनपरिवर्तन करण्याची कुठलीही संधी कुणालाही मिळणार नव्हती.
परीक्षेचा पहिला दिवस. मी वेळेवर कॉलेजमध्ये गेलो. नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचलो. प्रश्नपत्रिका हातात घेतली. ती वाचून काढल्यावर तर आपला निर्णय किती योग्य आहे, याची खात्री पटून स्वतःला पैकीच्या पैकी मार्क्स मी देऊन टाकले. प्रश्नपत्रिकेतला एकही प्रश्न ओळखीचा वाटत नव्हता. नापास होण्यापेक्षा ड्रॉप घेणं हे अधिक प्रतिष्ठेचं होतं. ‘आमचा मुलगा नापास झाला’, यापेक्षा ‘आमच्या मुलानं ड्रॉप घेतला’ असं सांगताना आईवडिलांनाही सोपं जाणार होतं. प्रतिष्ठा वाचवल्याबद्दल आईवडिल शाबासकी देतील, अशी एक कल्पनादेखील मी बसल्या बसल्या रंगवून घेतली. उत्तरपत्रिकेवर नाव लिहिलं, नंबर लिहिला. समास वगैरे आखले. नंतर मात्र मनात जो विचार आला, त्यामुळं पोटात मोठा खड्डा पडल्यासारखं झालं. मी पेपरला हजेरी लावली होती. त्यामुळं या पेपरमध्ये मी एकही ओळ लिहीली नसती, तरी मला नापास करार मिळणार होता. आपण इतके निर्बुद्ध कसे ठरलो, हा विचार करत पुढचा तास, दीड तास गेला. मग उत्तरपत्रिका जमा करून तिथून बाहेर पडलो. तीन तासांचा पेपर दोनच तासात सोडवल्याचं आश्चर्य आणि कौतुक इतरांच्या चेहऱ्यावर उमटलं असणार. पण मी ते पाहिलं नाही. बाहेर जाऊन भजी प्लेटवर ताव मारला. टेन्शनमध्ये दुसरं करणार तरी काय?
घरी आल्यावर डोकं दुखायला लागलं होतं. घरच्यांना सांगण्याचा क्षण जवळ आल्यामुळं दबाव प्रचंड वाढला होता. प्रत्येकाला वेगवेगळं गाठून हे सांगण्याची कल्पना मी कधीच धुडकावून लावली होती. प्रत्येकानं नव्यानं आश्चर्यचकित होणं, मी त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या प्रतिक्रिया, असं वेगवेगळं प्रात्यक्षिक मला नको होतं. त्यामुळं आई, वडिल आणि बहिण तिघंही एकत्र असताना आपण याबाबत सांगावं, असा माझा प्लॅन होता. ती वेळ घरी पोचल्यावर काही मिनिटांतच आली. सर्वजण संध्याकाळचा चहा घेत असताना मी विषयाला हात घातला. माझा निर्णय सांगितला. सर्व काही मनात ठरवल्याप्रमाणं आणि त्याच क्रमानं सांगितलं. वक्तृत्व स्पर्धेत मुद्दे मनात ठरवून, त्यांचा क्रम लावून तसेच मांडण्याची सवय, अशी कामी येईल, याची कल्पनाही मी केली नव्हती. माझ्या निर्णयाबाबत मी दहा मिनिटांचं एक भाषणच ठोकलं. फक्त ते संपल्यावर टाळ्या मिळाल्या नाहीत. एक शांतता पसरली. मी आईकडं पाहत होतो. ती वडिलांकडं पाहत होती. वडिल खाली पाहत होते. मी आईकडं पाहत असल्यामुळं बहिण कुणाकडं पाहत होती, माहित नाही. ‘ठीक आहे. आता बोलून तरी काय उपयोग आहे?’ असं वडिल म्हणाले. अशी वाक्यंदेखील टाळ्याच असतात, हे तेव्हा मी स्वतःशी कबूल केलं. डोकेदुखी हळूहळू कमी व्हायला लागलीय, हे जाणवत होतं. त्या रात्री कुणीच कुणाशी फारसं बोलत नव्हतं. मी देखील अवघडलेपणा टाळण्यासाठी घराच्या गच्चीवर जाऊन अधिकाधिक वेळ काढत होतो. रात्री जेवताना पुन्हा वडिलांनी तो विषय काढला. मात्र आता तणाव निवळला होता. यंदा ड्रॉप घेतला असला, तरी पुढच्या वर्षी मी काही तरी दिवे लावून दाखवावेत, याची तंबी देण्याइतपतच आता त्या विषयात राम उरला होता. विषय महत्त्वाचा नव्हताच. ती रात्र सरणंच महत्त्वाचं होतं.
पहिल्या इयत्तेपासून तोपर्यंतच्या काळातली सर्वात मोठी सुट्टी सुरू झाली होती. पुण्याला माझी आत्या राहायची. तिकडे जायचा प्लॅन तयार होत होता. कुठलीही गडबड नव्हती. परत कधी यायचं, याची चिंता नव्हती. एका वर्षाची मोठी सुट्टी घेऊन मी पुण्याला निघालो.

Comments
Post a Comment